संपादक:-सचिन गुंजाळ,नव दृष्टी न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (शुक्रवार) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अडचणीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. दौरा आटपून मुंबईला परतण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र, यावेळ पायलटने विमान चालवण्यास नकार दिल्याने तब्बल ५० मिनिटं एकनाथ शिंदे यांना उभे राहावे लागले. शिंदे यांच्या विलंबामुळे मात्र एका महिलेला जीवदान मिळाले आहे.
शीतल पाटील असे या महिलेचे नाव असून, त्या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल याना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. परंतु, त्या विमानतळावर पोहोचण्याआधीच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. मुंबईत लवकर पोहोचणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते यानंतर त्यांना आपली किडणी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होऊ शकेल की नाही चिंता सतावू लागली होती. त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरूनच मुंबईकडे जाणार असल्याचे समजले.
त्यानंतर शीतल पाटील यांच्या पतीने ही अडचण विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. यानंतर कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांना सांगितली. त्यानंतर लगेचच गिरीश महाजन यांनी या महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. तसेच ‘वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावमध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच’ असे शिंदे यांनी सांगत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल पाटील आणि त्यांच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईला आणले. तसेच प्रवासादरम्यान शिंदे यांनी स्वतः त्या महिलेशी संवाद साधून तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल आपुलकीने चौकशी केली. याशिवाय मुंबईत पोहोचल्यावरही त्यांनी केवळ मदत केली नाही, तर शीतल पाटील यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था देखील करून दिली. यामुळे त्या रुग्णालयात वेळेवर पोहोचू शकल्या. त्यांच्या या कृतीतून उपमुख्यमंत्री शिंदे हे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहेत, असे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment