राज्यात मुसळधार पाऊस

 संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी न्यूज 





कोकणासह नाशिक पुण्याला झोडपले -गोदावरी -मुळा- मुठा इंद्रायणीला पुर

मुंबई/पुणे/नाशिक 

मराठवाडा सोडत राज्याच्या विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबई, पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागांत रस्ते तुंबले असून, काही भागांत रस्त्यांवर कंबरेइतके पाणी साचले आहे. कोकणात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. नाशिक, पुण्यातही नद्यांना पूर आला असून, सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने या भागातील नद्या हीदुथडी भरून वाहात आहेत, मात्र, मराठवाड्याच्या नशिबी प्रतीक्षा कायम आहे.


जगबुडीने ओलांडली धोक्याचे पातळी


रायगड जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नगरपरिषदेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जगबुडीचे पाणी मटन मार्केटमध्ये शिरले, नदी शेजारील सर्व्हिस रोड पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने खेड शहराला पुराचा धोका कायम आहे.


रायगडमध्ये शाळा, कॉलेजेसला सुटी


गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात १३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रायगडमधील शाळा आणि कॉलेजेसना गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली.


मराठवाड्यातील जिल्हे कोरडेच


एकीकडे मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुरू असताना मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडीच आहेत. परभणी जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल १३१ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे परभणी जिल्ह्यात फक्त १३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला. परंतु आता पाऊस गायब झाला असून, जोरदार वारे सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील छ. संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांना सरसकट पावसाची प्रतीक्षा आहे.

Comments