शिव सेना उबाठा ला खिंडार वैशालीताई सुर्यवंशी भाजपमध्ये पक्ष प्रवेश निश्चित दि.१९ रोजी मुंबईत पक्ष प्रवेश
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
नव दृष्टी न्यूज:शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या आपल्या पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे ठरले झाले आहे. यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना-उबाठा पक्षाला जोरदार हादरा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून उद्या दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजीत कार्यक्रमात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
वैशालीताई सुर्यवंशी या माजी आमदार कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या असून राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. त्यांनी गेल्या वर्षीची विधानसभा निवडणूक देखील शिवसेना-उबाठा कडून लढविली होती. यात त्यांना अपयश येऊन त्यांचे चुलत बंधू किशोरआप्पा पाटील यांनी बाजी मारली होती. निवडणुकीतील निकालानंतर त्या अनेकदा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसून आल्या होत्या. मात्र गेल्या महिनाभरापासून त्या भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. आपल्या समर्थकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचे निश्चीत केले आहे. वैशालीताईंच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या आधी अलीकडेच माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पाठोपाठ त्या भाजपमध्ये दाखल होत आहेत. यामुळे भाजपची पाचोरा-भडगाव मतदारसंघातील ताकद वाढणार आहे. विशेष करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला याचा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पर्यायाने महाविकास आघाडीला मात्र वैशालीताई सुर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशाने जबर धक्का बसणार असल्याचे निश्चीत आहे.

Comments
Post a Comment