संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
जळगाव : एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवारी (दि.1) एकमोठा अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MH 20 BL 3402) क्रमांकाची एस.टी. बस नाल्यात पलटी झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू, तर 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
एस टी बस एरंडोलवरून भडगावकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात जाऊन पलटी झाली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात येत आहे.
एक प्रवासी जागीच ठार झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर 35 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर एरंडोल येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, आरोग्य विभाग व एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ एरंडोल-कासोदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment