छत्रपती संभाजी नगरच्या अंबाला येथे सामूहिक विवाह जेवणातून 600 जणांना विषबाधा 8 वर्षीय बालकाचा मृत्यू
संपादक -सचिन गुंजाळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाला येथे शुक्रवारी (25 एप्रिल 2025) ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अंबाला, महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर यासह परिसरातील 32 ठाकरवाड्यांमधून सुमारे 400 ते 600 पाहुणे उपस्थित होते. मात्र, या आनंदी प्रसंगाला गालबोट लागले जेव्हा जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 600 जणांना आजारपणाला सामोरे जावे लागले. या दुर्घटनेत एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, 17 जणांची प्रकृती गंभीर आहे.
विवाह सोहळा दुपारी 4:30 वाजता संपन्न झाला आणि त्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. या जेवणात सहभागी झालेल्या अनेकांना दुसऱ्या दिवशी (26 एप्रिल) सकाळपासून उलट्या, चक्कर येणे, जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रभावित व्यक्तींना तातडीने करंजखेडा येथील ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालये आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेत महादेव खोरा येथील सुरेश गुलाब मधे (वय 8) या बालकाचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तसेच, अंबाला येथील संगीता मेंगाळ (वय 25) यांच्यासह 17 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांवर स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैदकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
विषबाधेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जेवणातील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक पोलिस यांच्याकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्न तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे
Comments
Post a Comment