सिलेंडर टंचाईचा प्रश्न गंभीर; काळाबाजाराचा संशय, कारवाईची मागणी रयत सेना
नवं दृष्टी न्यूज चाळीसगाव (प्रतिनिधी): शहरात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर रोजच मोठ्या रांगा दिसत असल्या तरी अनेक ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही गॅस एजन्सीकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचबरोबर काही ठिकाणी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात जादा दराने विक्री होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ग्राहकांना नियमानुसार मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असून, बुकिंग करूनही वेळेत गॅस न मिळाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करावी, तसेच पारदर्शक व नियमित गॅस वितरण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.